‘मी गौरी!! आयुष्यातील पहिली बारा वर्ष माझ्या गावात/घरात राहून आज मी मुंबईला आले आहे. थोडीशी भिती आणि खूपशी स्वप्न घेऊन! मला तुमच्याशी काहीसं बोलायचंय!’ गौरी आनंद पाटील यांच्या पुस्तकाची ही अर्पणपत्रिका खूप काही सांगून जाते. एका मनस्वी मुलीशी ओळख होते.
तिचे लेखन पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाले असले, तरी ते पहायला ती या जगात नाही. तिने लिहिलेल्या तिच्या डायरीची ही पाने आहेत. ‘आयुष्य सुंदर आहे, आणि मी ते अजून सुंदर बनविणार,’ हा विचार घेऊनच तिने तिच्या वाट्याला आलेले अल्प आयुष्य सुंदर केले. या वाटचालीत तिला भेटलेली माणसे आणि पुस्तके, तिच्या मनात आलेले विचार तिने शब्दबद्ध केले आहेत.