महाकाय पिरॅमिड, लांबच लांब पूल, डोळ्यांना सुखावणाऱ्या सिडनी ऑपेरासारख्या कलाकृती, प्राचीन लक्षवेधक मंदिरे आणि आयफेल टॉवर, या सर्वांनाच परिस स्पर्श लाभला आहे तो इंजिनीअरचा. आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीतील डॉक्टरेट मिळवलेल्या प्रा. हेमंत पाटील यांनी जगभरातील चाळीसच्या वर मेगास्ट्रक्चर कशी आकाराला आली याचा सोप्या भाषेत घेतलेला आढावा म्हणजे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या पुलावरून तुमची गाडी चालवत जाल, भव्य सभागृहात बसून ऑपेरा अनुभवाल, रौद्ररूप असलेल्या समुद्राखालून कोरून काढलेल्या बोगद्यातून गाणं ऐकत लॉन्ग ड्राईव्हला जाल, त्यावेळी त्या अचाट आणि अफाट कामामागे ज्या अज्ञात कार्यकर्त्यांचे श्रम खर्ची पडले असतील, तेव्हा याची आठवण तुम्हाला नक्कीच येईल. याशिवाय दहा मुलखावेगळ्या परंतु प्रतिभावान आर्किटेक्ट्सची करून दिलेली ओळख वाचताना, एक वाचक म्हणून तुमचा प्रवास नक्कीच समृद्ध होईल.