‘जय स्वावलंबन’ हा आईचा कानमंत्र होता. कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये; आपल्याला काम येत असेल तर मदत नी सही सावध असतात आणि आपणही त्यांच्यावर अवलंबून नसतो हे तिचे साधेसुधे तत्त्व होते. अनेकांच्या पत्रिका पाहणे, जुळवणे, संकटप्रसंगी त्यांना मानसिक आधार देणे, यात माझ्या वडिलांचे तिला संपूर्ण सहकार्य होते. याचबरोबर कीर्तन करणे, चतुर्मासांत प्रवचने करणे, गप्पा मारता मारता एकीकडे स्वेटर विणणे, बाळंतविडे, कापडी- कागदी फुले बनवणे हे असे अनेक किरकोळ वाटणारे, पण खटाटोपी उद्योग ती निरलसपणे करीत असे. यातून मिळालेले सारे मानधन ती सेवाभावी संस्थांना देत होती. स्वतःपेक्षा दुसर्यांचे हित तिने कायम पाहिले व जपलेही.